🔸 प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोचपावती जनता नक्कीच देईल अशी आमदार दरोडा यांची ग्वाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांनी शहापूर विधानसभेसाठी भरीव निधी दिल्याने मतदार संघातील अनेक कामे मार्गी असून मतदार संघाच्या विकासाला गती मिळाली असल्याचे प्रतिपादन शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी केले आहे.
वाडा तालुका राष्ट्रवादीच्यावतीने ब्लॉसम रिसॉर्ट येथे शुक्रवारी (२ ऑगस्ट) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सत्तेत सहभागी झाल्यानंतर आम्ही सुचवलेली विकास कामे अजितदादांनी मोठ्या विश्वासाने तात्काळ मंजूर केली असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने काम करून कार्यकर्त्यांनी अजितदादांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा, असेही यावेळी बोलताना आमदार दरोडा यांनी सांगितले. तर मतदार संघात मोठ्या संख्येने विकास कामे होत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते खालच्या पातळीवर उतरून टीकाटिपणी व नको ते उद्योग करत आहेत. विरोधकांच्या व टीकाकरांच्या तिकेकेकडे लक्ष न देता कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली झालेली कामे पोहोचवावीत. आपण प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोच पावती जनता आपल्याला नक्कीच देईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी विक्रमगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद असून हा आमचा परंपरागत मतदार संघ आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड विधानसभा राष्ट्रवादीलाच मिळावा, अशी मागणी जिल्ह्याच्यावतीने आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष आनंद भाई ठाकूर यांनी केले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे पालघर जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर, कार्याध्यक्ष कमळाकर धूम, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा जेष्ठ कार्यकर्ते संदीप वैद्य, प्रदेश सदस्य डी. के. विशे, महिला बालकल्याण सभापती रोहिणी शेलार, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष कल्पना तारमळे, पालघर जिल्हा युवक अध्यक्ष रोहन पाटील, जिल्हा सरचिटणीस सुरेश फडवळे, कमलजीत धानमेहेर, डहाणू तालुका अध्यक्ष विपुल राऊत मोखाडा तालुका अध्यक्ष विलास पाटील जव्हार तालुका अध्यक्ष वैभव अभ्यंकर विक्रमगड तालुका अध्यक्ष प्रकाश भोये यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी मानले. तर प्रास्ताविक संपर्क अध्यक्ष नामदेव साबळे यांनी केले.
यावेळी वाडा तालुका कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले. तर वाडा तालुक्यातील रस्त्यांसाठी व अन्य विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार दौलत दरोडा यांचे संबंधित गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी विशेष आभार मानले आहे.