गावा गावात जाऊन जल जीवन योजनेबाबत जनजागृती आणि आंदोलन
ठाणे पालघर जिल्ह्यात श्रमजीवीने पाणी पेटवले
पालघर:
देशभरातील नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी देणारी देशाच्या पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी असलेली जल जीवन मिशन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेच्या टेंडर प्रोसेस, अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करणे, पाईप खरेदीत अपहार अशा अनेक गोष्टी आता श्रमजीवी संघटना पुरव्यानिशी उघड करत असून बोगस बिल घेणारे ठेकेदार आणि देणारे अधिकारी यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
याच बाबत श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते गावागावात मीटिंग घेऊन जनजागृती करत असतानाचा श्रमजीवीचे संस्थापक तसेच राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित स्वतः २ एप्रिल पासून ठाणे पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात २-२ सभा घेऊन या योजनेचा उडलेला बोजवारा चव्हाट्यावर आणणार आहेत. त्यामुळे या पाण्याच्या योजनेला श्रमजीवी संघटनेने चांगलाच प्रेशर पंप लावून ठाणे पालघर जिल्ह्यात पाणी पेटवले असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
विवेक पंडित हे स्वतः सभा घेऊन लोकांकडून योजनेची सध्याची स्थिती समजून घेणार आहेत. स्वप्नात सुद्धा नसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्यक्षात निधीच्या रूपात दिले, त्यामुळे प्रत्येक झोपडीत नळाने पाणी मिळालेच पाहिजे,त्यासाठी जनतेने लढलेच पाहिजे,ही आपली भूमिका सभामध्ये मांडतील अशी अपेक्षा आहे.
प्रत्येक गावात शासनाच्या जल आणि जीवन मिशन अंतर्गत हर घर जल देण्याचा कार्यक्रम सुरु आहे. ०४ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील राहणाऱ्या सर्व कुटुंबातील घरात, बंगल्यात, घरकुलात, झोपडीत, झापात नळाने पाणी पुरवठा मिळालेच पाहिजे अशी योजना आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कोट्यवधी रुपयाची तरतूद केली असून १५ व्या वित्त आयोग व पेसा मधून ही पाणी पुरवठासाठी खर्च होणार आहे. सदर योजनेसाठी निधीची कमतरता नसताना योजना पूर्ण करण्याची मुदत संपली असून अजूनहि अनेक गावांमध्ये सर्व घरांना, झोपड्यांना गावात नळाने पाणी पुरवठा झालेला नाही. विशेष म्हणजे एकदा एखाद्या गावात ही योजना राबवली गेली की पुढचे ३० वर्ष त्या गावात पुन्हा पाण्यावर शासकीय खर्च करता येणार नाही. असे असल्याने आहेत त्या योजनांचे काम प्रभावी व्हायला हवे आणि कोणत्याही जाती धर्म वर्गातला असो प्रत्येकाला मुबलक पाणी मिळाले पाहिजे असा श्रमजीवी संघटनेचा निर्धार आहे.
या योजनेत ग्रामसेवक व पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता समिती यांनी प्रत्येक घरात, झोपडीत, झापात नळाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करायची आहे. ती अजूनही झालेली दिसत नाही .शासन निर्णयाप्रमाणे दिनांक ३१ मार्च २०२४ पूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची होती परंतु अजून ही गावातील प्रत्येक कुटुंबातील घरांना नळ जोडणी झालेली नाही.
या जल जीवन मिशन योजनेतील पहिल्या व दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामे अजूनही अर्धवट आहेत. त्यामुळेच गावातील प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ पोहचलेला नाही . या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे व कामी निकृष्ट दर्जाची झाल्याचे संघटनेने केलेल्या पाहणीत लक्षात आल आहे, तसेच काही गावांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम न होता दुसऱ्या टप्प्याचे काम करून आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तारखेला (३१ मार्च पर्यंत ) ठेकेदारांना बिल अदा करण्याची शक्यता आहे. म्हणूनच संघटनेने गेले ३ दिवस प्रत्येक पाणी पुरवठा कार्यालयात प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा पहारा ठेवला असून अशी बोगस देयक काढण्यापासून ठेकेदारांना रोखण्यात श्रमजीवीला यश आले आहे.
गाव – पाड्यातील प्रत्येक घराला, झोपडीला, झापाला नळाद्वारे पाणी पुरवठा मिळावा व झालेल्या कामाची सखोल चौकशी व्हावी यासाठी आपल्या तालुक्यात दिनांक १ एप्रिल ते ७ एप्रिल २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीवर “हंडा मोर्चे काढण्याचे आंदोलन श्रमजीवी संघटनेने जाहीर केले आहे.
हे हंडा मोर्चे आणि विवेक पंडित यांच्या दौऱ्यामुळे ठाणे पालघर जिल्ह्यातील पाण्याने चांगलाच पेट घेतला आहे.