- अनुसूचित कल्याण समितीच्या माध्यमातून मागासलेल्या जनतेच्या विकासासाठी काम करणार – आमदार दौलतजी दरोडा
राज्यातील मागास जनतेच्या अनेक समस्या प्रलंबित असून अनुसूचित कल्याण समितीच्या माध्यमातून त्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्य अनुसूचित कल्याण समितीचे अध्यक्ष तथा शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांनी केले आहे.
वाडा येथे रविवारी (18 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पालघर जिल्हा बैठक व अनुसूचित कल्याण समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्याबद्दल आमदार दरोडा यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार दरोडा यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकारकडून आदिवासी समाजासाठी विविध योजनांसाठी भरीव निधी देण्यात येत असून त्या निधीचा योग्यप्रकारे विनियोग झाला पाहिजे, तरच त्याचा खरा फायदा मागास भागातील जनतेला होईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष आनंदभाई ठाकूर, ज्येष्ठ नेते संदीप वैद्य, महिला जिल्हा अध्यक्षा रोहिणी शेलार, जिल्हा सरचिटणीस मुकणे सर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष नितीन जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश कासट, शैलेश कर्मोडा यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी केले.
या कार्यक्रमात जव्हार येथील बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या समवेत तालुक्यातही सरपंच – उपसरपंच व अन्य कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
तसेच कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या वाडा तालुका महिला अध्यक्ष पदावर जान्हवी जगदीश पाटील (आबिटघर) यांची नियुक्ती करण्यात आली असून महिला जिल्हा उपाध्यक्ष पदावर चित्रा पाटील व तालुका सरचिटणीस पदावर रंजना भागडे यांची नियुक्ती करण्यात आली.


