वाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली येथे बंद घरात तिघांचे मृतदेह आढळून आले होते. या तिघांवर राॅडने वार करून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. असून आरोपीला वाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नेहरोली येथील बोंद्रे आळी या ठिकाणी राहणारे मुकुंद बेचलदास राठोड (70) हे नेहरोली येथे 25 वर्षापासून राहत आहेत. त्यांचे दोन मुलगे मुंबई येथे राहतात.आठ दिवसांपासून वडिल आई आणि बहिणीचा संपर्क न झाल्याने त्यांचा मुलगा सुहास हा शुक्रवार (दि.30) दुपारी नेहरोली येथे आला.घराला कुलूप बघून शेजारी चौकशी केली असता काही माहिती मिळाली नाही.शेवटी घराचे कुलूप तोडून घरात गेला असता त्याला दुर्गंधीचा वास आला.थोडा पुढे गेल्याने बाथरूमच्या दरवाज्यात वडिलांचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी सरळ वाडा पोलीस स्टेशनला जाऊन या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देताच घरात पत्र्याच्या पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेहही आढळला. ही घटना होऊन बरेच दिवस झाल्याने प्रेताला दुर्गंधी सुटली होती.
मुकुंद बेचलदास राठोड हे नेहरोली येथे 25 वर्षापासून स्थायिक झाले होते. त्यांनी स्वतः जागा घेऊन एक इमारत बांधली होती . इमारतीत भाडेकरू सह स्वतः तेही एका ब्लॉकमध्ये राहायचे पत्नी आणि मुलगी यांच्या समवेत ते राहत होते. परंतु, भाडेकरूनेच या घरात पैशांचे घबाड असेल या उद्देशानेच या हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले असून आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. या घरात राहणारा भाडेकरू हा उत्तर प्रदेशातील असून या घरात पैशांचे घबाड मिळेल या उद्देशाने त्याने सर्वप्रथम मुलगी संगिता हिच्या डोक्यावर राॅडने वार करून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर कांचन हिच्या डोक्यात राॅडने वार करून दोघीनींहा ठार करून त्यांना बंद पेटीत ठेवून त्यांची विल्हेवाट लावली. त्यानंतर मुकुंद हे बाहेर गेले असल्याने तेही घरी पोहचले.आरोपी दबा धरुन घरातच बसला होता. त्यानंतर मुकुंद यांच्यावर पण राॅडने वार करून त्यालाही ठार करून तेथून पोबारा केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी वाडा पोलिसांची पाच पथके रवाना झाली होती. अखेर उत्तर प्रदेशातून आरोपीला ताब्यात घेतले असून गुरूवारी (ता.5 सप्टेंबर) सायंकाळी पालघर येथील पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याची माहिती देणार असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी सांगितले.
भाडेकरूनेच या घरात पैशांचे घबाड असेल या उद्देशानेच ही हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले असून वाडा पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.