पालघर दि. ०२ (जिमाका): राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच, महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या वसई आणि विरार या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील गरजु महिलांना रोजगारासाठी “पिंक (गुलाबी) ई- रिक्षा” ही योजना महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मबावि-२०२४/प्र.क्र.२२/का-२दिनांक:-०८/०७/२०२४ नुसार महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली आहे.
सदर योजनेअंतर्गत पालघर जिल्हयातील वसईआणि विरार शहरातील ४०० गरजू महिलांना रोजगारासाठी “पिंक (गुलाबी) ई- रिक्षा” उपलब्ध करुन देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
सदर योजनेंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्यशासन २०% आर्थिक भार उचलेल तर योजनेचे लाभार्थी महिला / मुली यांच्यावर १०% आर्थिक भार असेल. ई रिक्षा किमतीच्या ७०% कर्ज अनुज्ञेय बँकाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. कर्जाची परतफेड कालावधी ५ वर्ष (६० महिने) असेल.
सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या अर्जदाराचे वय १८ ते ३५ दरम्यान असणे अनिवार्य आहे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये ३ लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
सदर योजनेंकरीता इच्छुक महिलांनी पिंक ई- रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय कक्ष क्र. १०८, पहिला मजला, प्रशासकीय इमारत-अ, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोळगाव रोड, पालघर – ४०१ ४०४. या पत्यावर अर्ज करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सदर योजनेअंतर्गत पालघर जिल्हयातील वसईआणि विरार शहरातील ४०० गरजू महिलांना रोजगारासाठी “पिंक (गुलाबी) ई- रिक्षा” उपलब्ध करुन देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.