शिवव्याख्याते प्रशांत देशमुख.
मो.9822 650 280
एक ट्रेन एका स्टेशन वरून दुसऱ्या स्टेशनवर चालली होती. अनेक माणसे त्या ट्रेनमध्ये होती. अचानक एक माणूस उठतो आणि त्या ट्रेनची चैन खेचतो. ट्रेन थांबते. गार्ड येऊन त्या माणसाकडे चौकशी करतात की चैन का खेचली ? बाकीची माणसंही रागावलेली असतात. कारण त्यांनाही कळत नसतं की या माणसांन असं का केलं. तेव्हा तो माणूस सांगतो की काही अंतरावर रेल्वेची पटरी उखडलेली आहे. गार्ड काही अंतरावर जाऊन बघतो, तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण खरोखरच रेल्वेची पटरी उखडलेली असते. या माणसाच्या दक्षतेमुळे मोठा अपघात टळलेला असतो.
ट्रेन धावत असताना कानावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत असतात. परंतु या माणसाला त्या आवाजामध्ये झालेला थोडासा बदल देखील जाणवतो. त्या आवाजाच्या बदलावरूनच त्याला कळतं की पुढे काहीतरी धोका आहे. याला म्हणतात अभ्यास. त्या इंजिनीयर असलेल्या माणसाचं नाव आहे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. आजही त्या माणसाचा जन्मदिवस इंजिनियर डे म्हणून साजरा केला जातो. मंडळी हे उदाहरण आहे आपल्या विषयातील तज्ञतेचे आणि अभ्यासाचे.
हिरोजी इंदुलकर शिवाजी महाराजांचे इंजिनियर. सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याची जबाबदारी हिरोजींवर राजांनी सोपविली होती. राजे आग्र्याच्या कैदेत सापडले होते. सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी पैसा अपुरा पडत होता. अनेक अफवा उठत होत्या. राजे परत येतील की नाही यावर शंका होती. आजच्या काळातला इंजिनियर असता तर आपले पैसे बुडतील म्हणून लगेचच काम बंद केले असते.
हिरोजींनी काय करावे? हिरोजींनी स्वतः कर्ज काढलं परंतु सिंधुदुर्गाचे काम बंद पडू दिले नाही. त्यानंतर रायगडाचे काम ही हिरोजींनीच केले. त्यावेळी राजांनी खुश होऊन हिरोजींना विचारले , बोला तुम्हाला काय बक्षीस देऊ ?
तेव्हा हिरोजी म्हणाले,
“राजं, काय बी नगं”
राजे ऐकेचनात तेव्हा हिरोजी म्हणाले,
“देणार असाल तर एकच काम करा. जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिवा”
मिरवण्यासाठी का ?अजिबात नाही भावना किती उदात्त आहे बघा हिरोजी पुढे म्हणतात,
“आपण गडावर असता तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला येता. आपण दर्शनाला येत असताना ज्या पायरीवर माझं नाव लिहिलंय, त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडल ना, तेव्हा मला असं वाटल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय. एवढं भाग्य माझ्या पदरी टाका”
आजही तुम्ही रायगडावर गेलात तर त्या पायरीवर लिहिलेल आहे
‘सेवेसी ठाई तत्पर,
हिरोजी इंदुलकर’
साडेतीनशे वर्षानंतरही ऊन, वारा, पाऊस सगळं सहन करत त्या पायरीवरच ते नाव अगदी आजही जसच्या तसं आहे . खिशात पैसे नसताना सुद्धा कर्ज काढून शिवरायांनी सांगितलेलं काम पूर्णत्वास नेण्यासाठी हिरोजींच्या आत मध्ये जे काही होतं ना त्यालाच निष्ठा म्हणतात.
सर विश्वेश्वरय्यांचं पहिलं उदाहरण होतं त्यांच्या विषयातील त्यांच्या तज्ञतेच आणि अभ्यासाचं. हिरोजींचे हे दुसर उदाहरण आहे शिवरायांवरील आणि स्वराज्यावरील त्यांच्या निष्ठेचं.
अभ्यास आणि निष्ठेन काम केली जातात तेव्हा ती पक्की होतात.
शिवरायांच्या काळात विज्ञान – तंत्रज्ञान विकसित नसताना सुद्धा जावळीच्या खोऱ्यात पार गावाजवळ शिवरायांनी बांधून घेतलेला शिवकालीन पूल आजही जसाच्या तसा आहे…. आणि सध्याच्या विज्ञान युगात काही महिन्यापूर्वी बांधलेला, पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालेला मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा मात्र कोसळतो.
काय कमी पडलं? अभ्यास की निष्ठा? की दोन्हीही?
महाराष्ट्राचा प्राण असलेल्या, श्वास असलेल्या, आमच्या अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या मानबिंदूच्या म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कामाबाबतीत असं होत असेल तर इतर कामांचं काय?आमच्या अस्मितांच्या प्रतीकांच रक्षण करायला आम्ही कमी पडतोय, याची मात्र मनात खंत आहे.
या विषयी काही गोष्टींचा विचार राजकारण बाजूला ठेवून प्रामुख्याने व्हायला हवा.
1) ज्याने कोणी हे काम केलं त्याला पुढे काम देताना दहा वेळा विचार करायला हवा.
2) ज्या कोणावर ही जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्या व्यक्तीला गुणवत्तेच्या आधारावर मिळाली होती की हितसंबंधांमुळे मिळाली होती, याची चौकशी व्हायला हवी.
3) पूर्वी असं खेदानं म्हटलं जायचं की वरून शंभर रुपये निघाले तर खालच्या सामान्य माणसापर्यंत एक रुपया पोहोचतो. 99 रुपये व्यवस्थेचे शिकार होतात. अशा पद्धतीचं काम करणाऱ्या त्या ठेकेदारापर्यंत नक्की किती रुपये पोहोचतात की त्यातले 99 रुपये व्यवस्थेचे शिकार होतात याची खात्री करायला हवी. त्यामुळेच तर त्याला निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरावे लागत नाही ना, याचाही शोध घ्यायला हवा.
4) शिवरायांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा लक्षात ठेवून अति घाई संकटात नेई असं तर झालं नाही ना?
5) आमचं सरकार असेल तेव्हा तुम्ही आम्हाला दोष द्यायचा आणि तुमचं सरकार असेल तेव्हा आम्ही तुम्हाला दोष देऊ, एवढ्याच राजकारणापुरतं या विषयाचा विचार न करता त्याच्या खोलात जायला हवं. किमान आमच्या अस्मितेच्या प्रतीक असलेल्या शिवरायांच्या बाबतीत तरी राजकारण बाजूला ठेवून अभ्यास, तज्ञता, कौशल्य, निष्ठा ,अस्मिता ,प्रेम या गुणांनीच शिवरायांच्या बाबतीतील कोणतही काम करायला हवं.
शिवरायांनी किल्ल्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केलं असतं तर इतक्या मोठ्या बलाढ्य शक्तींसमोर आमचं स्वराज्य टिकलं असतं का? शिवरायांच्या नावाचा उपयोग या ना त्या कारणांनी सगळेच पक्ष करतात, आम्ही सुद्धा बेंबीच्या देठापासून शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देतो . त्यामुळे असं जेव्हा काही घडतं तेव्हा मराठी माणूस म्हणून आम्हा सर्वांनाच थोडी का होईना …. वाटलीच पाहिजे. त्या सगळ्याची जबाबदारी थोडी का होईना आमच्यावरही येऊन पडते. कारण शेवटी राजकारणी,ठेकेदार ,शिल्पकार ,अधिकारी, इंजिनीयर आमच्याच समाजाचे घटक आहेत ना? त्यांच्यामध्ये सध्याच्या समाजाचेच प्रतिबिंब पडलेलं असणार ना?
स्वतःच्या कामाशी प्रामाणिक असणारी निष्ठावान, अभ्यासू माणसं सर्वच स्तरावर आम्हाला निर्माण करावी लागतील. असा समाज आम्हाला घडवावा लागेल. त्यासाठी त्यांच्यामध्ये ही मूल्य रुजवावी लागतील. हे काम एका दिवसात होणार नाही. सातत्य ठेवावे लागेल. केवळ फक्त वर वरची मलम पट्टी करून उपयोग नाही. मूळ रोगाला हात घालावा लागेल.
पोटापाण्यासाठी मी जे काही काम करतोय ते काम मी अत्यंत निष्ठेने, कौशल्याने, एकाग्रतेने, समरसतेने आणि आनंदाने आज पासून करीन अशी आपण प्रतिज्ञा करूया आणि कामाला लागू या.
जय शिवराय!