मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा ३१ ऑगस्टला

रक्कम थेट खात्यामध्ये जमा होण्यासाठी आधार सिडींग आवश्यक

पालघर दि. २४ (जिमाका): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३१ जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दि. १७ ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे. ई- केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा ३१ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने जिल्हयातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची आधार सिडींग करुन ई – केवायसी प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.

जिल्हयात ३१ जुलैपर्यंतचे २ लाख ९६ हजार २२९ अर्ज प्राप्त झाले असून, २ लाख ८३ हजार २२१ अर्ज मंजूर करुन लाभ वितरणासाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या पैकी आधार सिडींग नसलेल्या ६१हजार २२४ लाभार्थ्यांना व्यक्तीशा बँकेत / पोस्टात जाऊन आधार सिडींग करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. तसेच नव्याने प्राप्त अर्जही विधानसभा क्षेत्रनिहाय समितीच्या अंतिम मंजुरीने शासनाकडे लवकरच पाठविण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील २ लाख २१ हजार महिलांना प्रत्येकी ३ हजार रुपये लाभ वितरीत करण्यात आला आहे. आधार सिडींग करुन ई – केवायसी पूर्ण नसल्याने ज्या महिलांच्या खात्यात रक्कम अद्यापपर्यंत जमा झाली नाही त्या लाभार्थी महिलांनी आधार सिडींग करुन ई – केवायसी पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.

आधार सिडींग करुन ई केवायसी प्रलंबित असलेल्या महिलांना शासनातर्फे मोबाइल संदेश पाठविण्यात आला आहे, त्यांनी तातडीने आपले खाते आधार सिडींग करुन ई – केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *