वाडा तालुक्यातील कुस्तीगीर पै.साईनाथ पारधी १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी-


दिनांक १९ ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान अमान ( जाॅर्डन) येथे जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाच्या ग्रिकोरोमन विभागातून ५१ कीलो वजनगटात सहभागी झालेला कोकणातील आदिवासी समाजाचा पै. साईनाथ पारधी यांनी कझाकीस्थानच्या येरासी मुस्सान कुस्तीगीराचा 3 विरुद्ध 1 गुणांनी पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे.
मु. गो-हे , तालुका वाडा , जिल्हा पालघर येथील पै. साईनाथ मोहन पारधी हा रहिवाशी असुन तो आदिवासी समाजाचा आहे .सुरूवातीस भाईंदर येथील गणेश आखाडा कुस्ती केंद्रात त्याने कुस्तीचे धडे गिरवले . यासाठी साईनाथला कुस्ती प्रशिक्षक सदानंद पाटील यांची मदत झाली.
तर जाणत्ता राजा कुस्ती केंद्राचे प्रमुख पै.संदीप भोंडवे यांनी महाराष्ट्रातील कुस्तीगीरांनी ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदक मिळवावे या उद्देशातून ” मिशन ऑलिंपिक ” ही योजना सुरु केली . या योजनेत कुस्तीगीरांची निवड करण्यासाठी जानेवारी २०२१ मध्ये जाणता राजा कुस्ती केंद्रावर महाराष्ट्रातील १५ वर्षाखालील कुस्तीगीरांसाठी निवड चाचणीचे आयोजन केले . या निवड चाचणीत महाराष्ट्रातील १६६ कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता. या निवड चाचणीतुन ” मिशन ऑलिंपिक ” या योजनेसाठी १० कुस्तीगीरांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या कुस्तीगीरांचा निवास , भोजन , खुराक व प्रशिक्षणाचा सर्व खर्च पै. संदीप भोंडवे अध्यक्ष असलेली ड्रीम फाऊंडेशन जाणता राजा कुस्ती केंद्र करत आहे.
या निवड चाचणीत पै.साईनाथ पारधी याची ४२ कीलो फ्रीस्टाईल विभागात ” मिशन ऑलिंपिक ” करीता निवड करण्यात आली . साईनाथचा १० ते १२ महीन्याचा कुस्तीचा सराव पाहून त्याचे वस्ताद पै.संदीप भोंडवे यांनी त्यास ग्रिकोरोमन खेळण्यास सल्ला दिला व त्यानंतर साईनाथचा ग्रिकोरोमनचा सराव सुरु झाला . साईनाथ जाणता राजा कुस्ती केंद्रात येण्याच्या अगोदर कधीच कोणतीही स्पर्धा खेळलेला नव्हता त्याच्या आयुष्यात पहीली कुस्ती स्पर्धा २०२२ सालची १५ वर्षाखालील राष्ट्रीय फेडरेशन कप ही स्पर्धा होती त्यामध्ये याने कास्यपदक मिळवले त्यापाठोपाठ झालेल्या राष्ट्रीय ग्रॅन्ड फीक्स स्पर्धेत सुध्दा कास्यपदक मिळवले … २०२४ मध्ये साईनाथने आपला कुस्तीचा दम दाखवत १५ वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवले. त्यापाठोपाठ झालेल्या १७ वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कास्यपदक पदकाची कमाई केली . जुन २०२४ मध्ये थायलंड येथे १५ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा झाली त्या स्पर्धेत सुध्दा साईनाथने भारताच्या वतीने प्रतिनिधित्व केले व आज पै.साईनाथ पारधी हा १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्ती ग्रिकोरोमन संघातुन ५१ कीलो वजनगटात कास्यपदकासाठी झालेल्या कुस्तीत कझाकीस्थानच्या येरासी मुस्सान कुस्तीगीराचा 3 विरुध्द 1 गुणांनी पराभव कांस्य पदक जिंकले.

आपल्या जिद्दीच्या मेहनतीच्या जोरावर आदिवासी समाजाचा कुस्तीगीर साईनाथ पारधे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्य पदक जिंकून जगात आपले नाव कोरले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *