वाडा /प्रतिनिधी:
दिवंगत अशोक गव्हाळे सर यांनी आपल्या वाटचालीत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात केलेली वाटचाल कधीही विसरता येणार नाही. गव्हाळे सरांचे कार्य आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांनी केले आहे.
स्व. हभप अशोक गव्हाळे फाऊंडेशनच्यावतीने गुरुवारी (28 सप्टे.) श्री क्षेत्र तिलसे येथे सौर ऊर्जा लोकार्पण व तीलसेश्र्वर फलक अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना आमदार दरोडा यांनी स्व. हभप अशोक गव्हाळे फाऊंडेशनच्यावतीने त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा पराग गव्हाळे व त्यांच्या परिवाराने सुरू केलेले सामाजिक काम कौतुकास्पद असून या कामामुळे दिवंगत गव्हाळे सरांच्या स्मृती कायम जिवंत राहतील, असे गौवोद्गार काढले.
या कार्यक्रमासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रोहिणीताई शेलार, वाडा पंचायत समिती उपसभापती जगदीश पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत मराडे, माजी उपसभापती रघुनाथ माळी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जयेश शेलार, युवा नेते रोहिदास शेलार, भाजपचे नेते नरेश आकरे, शिवसेनेचे विधानसभा संघटक पांडुरंग पटारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्व. हभप अशोक गव्हाळे फाऊंडेशनच्यावतीने श्री क्षेत्र तीलसेश्वर येथे सौर दिवे लावण्यात आले असून मंदिर सौर ऊर्जा फलक लावण्यात आला आहे. तर मंदिर परिसरात दिवंगत गव्हाळे सरांच्या स्मरणार्थ रंगमंचही उभारण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाऊंडेशनचे अनिल खिलारे यांनी, आभारप्रदर्शन वैभव गव्हाळे यांनी तर सूत्रसंचालन मोतीराम नडगे यांनी केले.